मुंबई – भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली असून या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच विखे पाटील आणि राम शिंदे आमनेसामने आले होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता होती. परंतु या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
दरम्यान या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मी पक्षासमोर माझी भूमिका मांडली. प्रत्येक पक्षात नाराजी ही असतेच चर्चेतून मार्ग निघेल असंही खडसेंनी म्हटलं आहे.
तसेच राम शिंदे यांनीही बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं दोनेही बाजू ऐकूण घेतल्या. विखे आणि माझी नगरमध्ये बैठक होईल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे. निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय झाले हे आम्ही पक्षाला आधीच कळवले आहे. आता कारवाईची अपेक्षा असल्याचे राम शिंदेंनी बैठकीपूर्वी प्रतिक्रिया दिली होती.
COMMENTS