नागपूर – नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तोकडी मदत केल्यामुळे भाजप आमदार आशिष देशमुख आंदोलनाला बसले आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतली. सिन्हा यांनी भाजप नेतृत्वाविरोधात नेहमीच आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरत त्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात अकोल्यात ठिय्या आंदोलन केलं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आशिष देशमुख एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान आपण भाजपात येऊन मोठी चूक केली असून याचा पश्चाताप होत असल्याची कबुली भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली आहे. साडेअकरा हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोदीवर कोणतीही कारवाई होत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन सुरू केल्याबरोबर माझ्या वडीलांच्या विरोधातील बॅंकेचे प्रकरण उकरून काढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख हे आशिष देशमुख यांचे वडील आहेत. रणजित देशमुख यांच्या मालमत्तेवर आयडीबीआय बॅंकेने जप्तीची कारवाई केली आहे. रणजित देशमुख यांनी आयडीबीआय बॅंकेकडून घेतलेल्या ५ कोटी ७० लाख रुपयांच्या कर्ज थकबाकीप्रकरणी बॅंकेने त्यांच्या आमदार निवासजवळ असलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोप त्यांनी केला असून आपण भाजपमध्ये आलो ही मोठी चूक असल्याचं ते म्हणाले आहेत.
COMMENTS