राजस्थान – राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजप आमदारानंच पक्षाला घरचा आहेर दिला असून जसं केलं तसं फेडावं लागणार असल्याचं या आमदारानं म्हटलं असून याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ग्यानदेव आहुजा असं या आमदाराचे नाव असून ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असतानाची ऑडिओ क्लिप आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार आहुजांनी वसुंधरा राजेंवर टीका केली आहे. जैसा किया है तूने, वैसा ही भरेगा, तेरी बदी का बदला, तूझको यहीं मिलेगा असं म्हटलं आहे.
दरम्यान ग्यानदेव अहुजा यांनी यापूर्वी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा पुकारला होता. भाजपच्या महामंत्र्यांनाही राज्याच्या नेतृत्वात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे पत्र त्यांनी लिहिले आहे. गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये लोकसभेच्या अलवर आणि अजमेर या दोन व विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या तिनही जागांवर काँग्रेसचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. तेव्हापासून भाजपातील केंद्रीय नेतृत्वही वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या वर्षाअखेर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
COMMENTS