मुंबई : लोकसभेच्या निवडणूक केंद्रात भाजपला बहुमत मिळाले. त्याप्रमाणे विधानसभेत भाजप सत्तेवर येणार आणि आपल्या पारड्यात मंत्रीपद पडणार या एकाच आशेवर काॅंग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो नेते भाजपमध्ये गेले. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पालटल्याने सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या भाजपच्या खासदार, आमदार आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मुळ पक्षाशी सलगी वाढवताना दिसतायत. पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि सातारचे शिवेंद्रराजे भोसले ही यातील आघाडीवरची नावं आहेत.
गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीतील पक्षांची घट्ट मैत्री झाली आहे. त्याचा डेमो त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखला. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीतही बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे गेल्या वर्षभरात पक्षांतर केलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा आपल्या मूळ पक्षांमध्ये प्रवेश करण्याची उत्सुकता लागू राहिली आहे. हे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.
भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे सांगली जिल्हा परिषद सभापती निवडीमुळे नाराजी नाट्य रंगले होते. तेव्हापासून ते भाजपच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत त्याहून अधिक अलीकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसायला लागलेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे संजय काका हा सांगलीच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेत. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजित दादांशी भेटीगाठी वाढल्यात. प्रशांत परिचारकही हळूहळू विकासकामांच्या निमित्ताने अजितदादांना भेटत आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या अशा नेत्यांची संख्या मोठीय. सत्तेशिवाय राजकारण करायची सवय नसलेल्या या नेत्यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. विकास कामांसाठी आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांना भेटत असल्याचा दावा हे नेते करत असले तरी असाच दावा त्यांनी त्यांचा मुळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतानाही केला होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे या नेत्यांच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय बनत आहेत.
COMMENTS