शिवसेनेचे जिल्ह्यात मोठे नुकसान हो‌णार, भाजप खासदाराचा गर्भित इशारा !

शिवसेनेचे जिल्ह्यात मोठे नुकसान हो‌णार, भाजप खासदाराचा गर्भित इशारा !

नांदेड – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपच्या युतीची घोषणा केल्यानंतर आज दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून आज 124 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेनंही आपल्या 70 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु अशातच लोहा विधानसभेवरून युतीत तणाव वाढला असल्याचं दिसत आहे. कारण भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसला आहे.

लोहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून आक्रमक चिखलीकर समर्थकांनी अपक्ष लढण्याची नारेबाजी केली आहे. खासदार चिखलीकर यांचे मुलगा प्रवीण चिखलीकर यांच्यासाठी जागा सोडण्याचे प्रयत्न होते. परंतु लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी केल्याने खा. चिखलीकर यांचा मतदारसंघ शिवसेनेने न सोडल्याची चर्चा आहे.

यापूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार होते. यानंतर ते भाजपच्यावतीने नांदेड लोकसभा निवडणूक लढवून निवडून आले. त्यामुळे लोहा कंधार विधानसभा व नांदेड उत्तर विधानसभा भाजपाला सोडवा असा आग्रह प्रताप पाटील चिखलीकर यांचा होता. मात्र शिवसेनेने हे दोन्ही मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्यामुळे चिखलीकर समर्थक अस्वस्थ झाले आहेत.  त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होणार असल्याचा खासदार चिखलीकर यांनी गर्भित इशारा दिला आहे.

COMMENTS