नागपूर – भाजप आमदारानं एका पोलीस अधिका-याला मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली असल्याची माहिती आहे. उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांनी सहायक पोलीस उपनिरिक्षक अनिल गर्जे यांना मारहाण केली आहे. याबाबत पोलीस अधिकारी आणि आमदार यांनी परस्परांच्या विरोधात उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान लोकसत्तानं छापलेल्या बातमीनुसार उमरेड पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक अनिल गर्जे रविवारी रात्री पत्नीसह त्यांच्या कारने गिरड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मांगरुड मार्गावर त्यांची कार पंक्चर झाली होती. चाक दुरस्तीसाठी ते घेऊन जात असताना त्याच मार्गाने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गाने सुधीर पारवे नागपूरला कारने येत होते. गर्जे यांच्या गाडीचे चाक पारवे यांच्या गाडीवर येऊन धडकल्यामुळे पारवे आणि त्यांचे स्वीय सचिव संतप्त झाले. यातून गर्जे आणि पारवे यांच्यात वाद झाला. अनिल गर्जे यांनी सुरुवातीला पारवे यांच्या कार्यकर्त्यांला आणि स्वीय सहायकाला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या पारवे यांनी शिवीगाळ करत गर्जे यांना मारहाण केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे पारवे यांच्यावर आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS