मुंबई – सोनू सूद देवदूत वगैरे नाही. हा निव्वळ माध्यमं आणि पीआर एजन्सीजचा खेळ आहे.सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजप, मनसेसह काँग्रेस नेत्यानंही राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संकट काळात सोनू सूद याने परप्रांतीय मजुरांना उदारपणे मदत करुन विलक्षण कामगिरी केली. मोठ्या मनाने त्याचा सन्मान करण्याऐवजी शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. मजुरांना मूळगावी परत पाठवण्याची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी त्यांनी या पातळीवर जाऊ नये अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केली आहे.
तसेच ‘कोरोना’वरुन लक्ष हटवण्यासाठी राजकीय आरोप होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला गांभीर्याने न घेण्याची टीका दरेकरांनी केली. भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांना ‘हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?’ असा सवाल केला आहे.
तसेच मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही राऊत यांच्यावर टीका केली आहे. मा. संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? ज्याने काम केलंय, त्याचं कौतुक करुया मनाचा मोठेपणा दाखवुया असो ‘रडण्या’पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार अशी बोचरी टीका खोपकर यांनी केली आहे.
COMMENTS