अकोला – नाना पटोले यांच्यानंतर आता भाजपमध्ये दुसरं बंड होण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण भाजपच्या एका खासदारानं पंधरा दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून रणजीत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रणजित पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही तर 15 दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा खासदार संजय धोत्रे यांनी दिला आहे.
दरम्यान रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केला असल्याचा आरोप खासदार धोत्रे यांनी केला आहे. घुंगशी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. तसेच या निवडणुकीत सरपंचपदासह सातही जागांवर काटे-देशमुख गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे पाटील यांच्या लोकांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप खासदार धोत्रे यांनी केला आहे. तसेच २६ तारखेला पाटील गटाच्या हल्ल्यात हिम्मत देशमुख यांचं बोट तुटलं होतं. मात्र याप्रकरणी अद्यापही गुन्हे दाखल झाले नसल्यानं धोत्रे धोत्रे आक्रमक झाले आहेत. अकोला जिल्हा भाजपात खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. या गटांमधील वाद आता वाढत असल्यामुळे अकोल्याचं राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS