भाजपला धक्का, ‘हा’ खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

भाजपला धक्का, ‘हा’ खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

पुणे – राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमधील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आलं असल्याचंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी रस्सीखेच सुरू असून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच काकडे यांनी आपल्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यांनी उदयनराजें भोसले यांच्यावर टीका केली होती.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा आहे. उदयनराजेंचं भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल करत संजय काकडेंनी उदयनराजेंवर टीका केली होती.

काकडे यांनी राज्यसभेसाठी दावा केला असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणलं होतं. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

COMMENTS