मुंबई चारकोप मतदारसंघ – भाजप आमदार योगेश सागर विजयाची हॅट्रिक करणार का?, ‘या’ नेत्यांचं आव्हान!

मुंबई चारकोप मतदारसंघ – भाजप आमदार योगेश सागर विजयाची हॅट्रिक करणार का?, ‘या’ नेत्यांचं आव्हान!

परमेश्वर गडदे, मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच आजी-माजी आमदारांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील चारकोप विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार योगेश सागर यांनीही विजयाची हॅट्रिक करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मतदारसंघातील गेल्या पाच वर्षातील आढावा ते घेत आहेत. तसेच नागरिकांच्या समस्यादेखील जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

दरम्यान एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या चारकोप मतदारसंघातून योगेश सागर यांनी दोन वेळेस विजय मिळवला आहे. याठिकाणी त्यांनी भाजपची मजबूत फळी तयार केली आहे. 2009 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार भरत पारिख यांचा पराभव करत चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलवलं होतं. तर 2014 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा पराभव केला होता. तसेच 2014 ला शिवसेना आणि भाजपची युती तुटली तेव्हा शुभदा गुडेकर या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून चारकोप विधानसभेतून उभ्या राहिल्या होत्या.

2009 विधानसभा निवडणुकीत भाजपचे योगेश सागर यांना 58,687 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या भरत पारेख यांना 42,324 मतं मिळाली होती. तसेच मनसेचे दीपक देसाई यांना 23,268 मतं मिळाली होती.

2014 मधील निवडणुकीतही
भाजपच्या योगेश सागर यांची जादू चालली. त्यांच्या मतांमध्ये जवळपास 14 टक्के वाढ झाली. यावेळी त्यांना 96 हजार 097 मतं मिळाली होती. तर शिवसेनाेच्या शुभदा गुडेकर यांना 32,730 मतं मिळाली होती. तसेच काँग्रेसच्या भरत पारेख यांना 21 हजार 733 मतं मिळाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीतही योगेश सागर हे विजयाची हॅट्रिक करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत योकेश सागर यांच्यापुढे काँग्रेस आणि मनसेचं आव्हान असणार आहे. काँग्रेसकडून भरत पारेख यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर मनसेकडून दिनेश साळवी चारकोप विधानसभेतून इच्छूक उमेदवार आहेत. तसेच शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून शुभदा गुडेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS