मुंबई – नव्या कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडीतील पक्ष आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
“हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम या सरकारने केलेलं नाही, आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचलं असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचं आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.
राणे म्हणाले,. “शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
COMMENTS