सांगली – लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपनं रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकरी नेते अशी ओळख असणारे सदाभाऊ खोत हे विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबतच जाणार आहेत. त्यामुळे खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची भाजपसोबत युती होण्याची शक्यता असून सदाभाऊ यांनी विधानसभेसाठी भाजपकडे जागांची मागणीही केली आहे. त्यात त्यांनी जयंत पाटील हे आमदार असलेल्या इस्लामपूर मतदारसंघाचीही जागा आपल्याकडे मागितली ते स्वत: याठिकाणाहून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान इस्लामपूरबरोबरच राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाय्रा इतरही मतदारसंघाकडे भाजपनं मोर्चा वळवला असल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारे मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाचपणी करत आहेत. अशातच इस्लामपूर मतदारसंघाची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदाभाऊ खोत यांना इस्लामपूरमधून लढण्यास बळ देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
COMMENTS