मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून महाजनादेश यात्रा काढली जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. या यात्रेला खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून राज्यात सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्ट रोजी शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथून सुरू होणार आहे. तर सिंदखेडराजा येथे या यात्रेचा समारोप होईल. तसेच साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत.
दरम्यान दुसरीकडे राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ४३८४ किमीचा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण 1 ऑगस्टपासून चंगलच तापणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS