… म्हणज्ये भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली ?

… म्हणज्ये भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली ?

परभणी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील काल परभणीच्या दौ-यावर होते. या दौ-यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना रावसाहेब दावने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आपल्याला परभणी लोकसभा आणि जिल्ह्यातील चारही विधानसभा स्वबळावर जिंकायच्या आहेत. त्यादृष्टीनं कामाला लागा असे आदेश दिले. परभणीत शिवेसनेचा खासदार आहे तसंच विधानसभेतही दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना जागा न सोडता सर्व जागांवर लढण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेनं एकला चलो ची भूमिका सातत्यानं मांडली असली तरी भाजपचे नेते आजपर्यंत संयमानं घेत आले आहेत. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही शिवसेनेनं भाजपवरचा हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. मग तो सामनातून असो किंवा उद्धव यांच्या सभेतून. अमित शहा यांच्या भेटीनंतर पालघरमध्ये झालेल्या सभेतही उद्धव यांनी आपण स्वबळाच्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेना एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेऊ असं वक्तव्य केलं होतं.

शिवसेना कितीही स्वबळाचा नारा देत असली तरी भाजपला मात्र युतीबाबत आशा आहे. मात्र काल परभणीमध्ये रावसाहेब दानवे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत. तेही युतीसाठी सारखी आशादायी भूमिका ठेवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर. त्यामुळेच आता भाजपनंही युतीची आशा सोडून स्वबळाची तयारी सुरू केली आहे की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

COMMENTS