भाजपची शरद पवारांना मोठी ऑफर ?

भाजपची शरद पवारांना मोठी ऑफर ?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत भाजपनं राष्ट्रवादीला ऑफर दिली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे. तसंच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचं आश्वासनही दिलं असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली आहे. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान भाजपने ऑफर दिल्याची चर्चा असताना शरद पवार हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात सत्तास्थापनेबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आज दुपारी 12:40 वाजता शरद पवार मोदींची भेट घेणार असून या भेटीदरम्यान ते राज्यातील शेतकय्रांसंदर्भात बातचीत करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भेटीत याच मुद्द्यावर जास्त भर असेल असे सांगण्यात येत आहे. केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे. तसेच यावेळी पवार यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS