केंद्रात भाजपची शिवसेनेला मोठी ऑफर ?

केंद्रात भाजपची शिवसेनेला मोठी ऑफर ?

नवी दिल्ली भाजपनं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठी ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे दुरावलेल्या शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राज्यसभेत उपसभापतीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपने शिवसेनेला ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे सिनिअर खासदार असलेले संजय राऊत हे उपसभापती होणार असल्याचं दिसून येत आहे. परंतु याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर पी जे कुरियन यांचा राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे लवकरच नव्या उपसभापतींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी हालचालींना वेग आला असून कोणत्याही परिस्थितीत हे पद विरोधकांना देण्यासाठी भाजप तयार नसल्यामुळे हे पद शिवसेनेला दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच राज्यसभेत सध्या संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे तीन खासदार आहेत. त्यापैकी संजय राऊत हे वरिष्ठ असल्यामुळे त्यांच्याच गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS