महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा, भाजपकडून राजीनाम्याची मागणी ! VIDEO

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा, भाजपकडून राजीनाम्याची मागणी ! VIDEO

मुंबई – पोलीस कर्मचाय्राला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी
भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अमरावती न्यायालयानं स्वागतार्ह निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केलं आहे.
महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसाला मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांचा जिल्हा सत्र न्यायालयात आरोप सिद्ध झाला असून त्यांना 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच त्यांचा कार चालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलीसकर्मी देखील शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे पोलिसांवर हात उचलण्याचा आरोप सिद्ध झालेल्या मंत्री यशोमती ठाकूर या नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देतील काय ? असा सवालही भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजपसोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील असं म्हटलं आहे.

तसेच न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल असही त्या म्हणाल्या.

COMMENTS