नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील केंद्रीय मंत्री आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. अपना दल हा उत्तरप्रेदशातील भाजपचा मित्रपक्ष असून अपना दल’च्या अनुप्रिया पटेल यांनी प्रियांका गांधी यांच्या भेटीदरम्यान आघाडी करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसचे पश्चिम युपीचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील उपस्थित होते. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल या पक्षाने मागील निवडणुकीत भाजपसोबत युती केली होती. तेव्हा भाजपने त्यांना लोकसभेच्या सात जागा सोडल्या होत्या. या पक्षाचे दोन खासदार आहेत. तर पूर्व उत्तर प्रदेशच्या 10 ते 12 जागांवर या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे हा पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यास या भागात भाजपचं मोठं नुकसान होणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS