मुंबई – अवघ्या काही तासात राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक 2 मंत्रीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवणारा भाजप पक्ष विरोधी बाकावर बसणार आहे. त्यालाठी भाजपकडून विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
परंतु महाविकासआघाडीच्या सरकारला धारेवर धरण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे. यावर केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान भाजपने फडणवीस यांनाच विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती.त्यामुळे साहजिकच फडणवीस यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडेल असे सांगितले जात होते. परंतु तरीही पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेले सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही ही संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु सध्या तरी फडणवीस यांचंच नाव आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
COMMENTS