शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपची मोठी खेळी, ‘हा’ नेता होणार पुण्याचा पालकमंत्री ?

शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपची मोठी खेळी, ‘हा’ नेता होणार पुण्याचा पालकमंत्री ?

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यासाठी भाजप मोठी खेळी करणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे–पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल भाजपनं सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.राधाकृष्ण विखे – पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. याबाबत विखे – पाटील यांनी देखील अनेकवेळा संकेत दिले आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून राधाकृष्ण विखे – पाटील हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपासून दूर झालेत. अहमदनगरच्या जागा वाटपावरून राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे – पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे – पाटील यांनी विजय देखील मिळवला. हा विजय आपण आजोबांना अर्पण करत असल्याचं म्हणत त्यांन शरद पवारांना टोला हाणला होता. त्यानंतर आता भाजप शरद पवार यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS