नवी दिल्ली – भाजपला जोरदार धक्का बसला असून ज्येष्ठ नेत्यानं आज पक्षाला रामराम ठोकला आहे. केंद्रातील मोदी सरकारवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर सिन्हा यांनी हा निर्णय घेतला आहे. सिन्हा यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. बिहारमधील पाटणा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात यशवंत सिन्हा यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.
दरम्यान यापुढे कुठलंही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. देशासाठी राष्ट्रमंचाची स्थापना करु अशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे. यातच भजापच्या अडचणीत मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. अनेक मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आहे. तर काहीजण साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. अशातच सिन्हा यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS