मुंबई – शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील युतीबाबत उद्या मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या म्हणजे बुधवारी 93वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक बनवायला सुरुवात होणार आहे. या स्मारकाचं निमित्त साधून भाजप आणि शिवसेनेतला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री कपत होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला आले तर आगामी निवडणुकीत युती करण्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते असं बोललं जात आहे.
दरम्यान दादरमधल्या प्रशस्त आणि ऐतिहासिक महापौर बंगल्यात बाळासाहेबांच स्मारक होणार आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारने तब्बल 100 कोटींची तरदूत केली आहे. बंगल्याच्या परिसरात जमिनीखाली हे स्मारक आकाराला येणार आहे. या बंगल्याला हेरीटेजचा दर्जा असल्याने स्मारकासाठी हा बंगला मिळणं कठिण काम होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष घालून स्मारकाचा मार्ग मोकळा केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. परंतु अजुनही शिवसेनेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर युतीबाबत चर्चा केली जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS