युती झाल्यामुळे कोंडी झालेले “हे” नेते आता काय करणार ?

युती झाल्यामुळे कोंडी झालेले “हे” नेते आता काय करणार ?

मुंबई – साडेचार वर्षात युतीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली कटुता, स्वबळाचे नारे, आणि त्यामुळे अनेक मतदारसंघात निर्माण झालेले इच्छुक उमेदवार यांचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सगळ्यात चर्चेत आलेला वाद म्हणज्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री खोतकर यांच्यातील वाद. काहीही झालं तरी दानवेंना पाडणार अशी गर्जना अर्जुन खोतकर यांनी केली होती. युती झाली तरी मैत्रीपूर्ण लढत करणार असंही खोतकर म्हणाले होते. ते आता काय करणार असंही ते म्हणाले होते. त्यामुळे खोतकर आता मैत्रीपूर्ण लढत करतात की काँग्रेसचा हात हातात घेतात याकडं पहावं लागेल.

युती होण्याच्या आधी मातोश्रीवर मुंबईतील शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये युती झाली तरी आणि नाही झाली तरी आम्ही किरट सोमय्या यांचे काम करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली होती. काहीही सांगा पण सोमय्या यांचे काम करण्यासाठी सांगू नका असंही शिवसैनिकांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता ईशान्य मुंबईतील शिवसैनिक नेमकं काय करतात याकडे पहावं लागेल.

तशीच परिस्थिती भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहे. तिथले भाजप खासदार कपील पाटील यांच्यावर शिवसैनिकांचा राग आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तिथं राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सत्ता संपादन केली आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवलं आहे. अहमदनगरमध्येही तशीच परिस्थिती आहे. परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी दीड वर्षापासून सुरू केली होती. आता मात्र युती झाली आहे. परभणीची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांनी आता अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे.

तिकडे नाशिकमधून सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे लोकसभेची तयारी करत होते. मात्र ती जागा आता शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांचीही गोची झाली आहे. एवढच नाही. तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही गेल्यावेळी शिवसेनेचे आमदार निवडूण आला आहे. त्यामुळे विधानसभेलाही त्यांना संधी मिळणार नाही. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणून लढणार की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार ते पहावं लागणार आहे.

गेल्यावेळी मोदी लाटेत दहिसरमधून भाजपच्या मनिषा चौधरी निवडूण आल्या होत्या. मात्र दहिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विनोद घोसाळकर आता काय करणार याकडे लक्ष लागलंय. तशीच परिस्थिती मागाठाणे मतदारसंघाची झाली आहे. मनसेतून भाजपमध्ये गेलेले आणि सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले प्रविण दरेकर यांची कोंडी झाली आहे. कारण मागाठाणे मध्ये सध्या शिवसेनेचे सुर्वे आमदार आहेत. बार्शीत राजेंद्र राऊत भाजपमध्ये गेले आहे. ती जागा शिवेसेनेकडे आहे. त्यामुळे ते पुन्हा शिवसेनेचा बाण हातात घेतात की भाजप ती जागा परदात पाडून घेते ते पहावं लागेल.

2014 मध्ये हिंगोलीचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील शिवाजी जाधव हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले होते. त्यांनी वसमतमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र थोड्या मतांनी ते पराभूत झाले होते. त्यांनतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला लक्षनिय यश मिळवून दिलं. 2014 पासून त्यांनी लोकसभेची जोरदार तयारी केली होती. मात्र युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. तसचं वसमतमध्ये तर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे त्यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. असे अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेतल्या नेत्यांची कोंडी झाली आहे. ते आता आघाडीचा सहारा घेतात की त्यांना शांत करण्यात युतीच्या नेत्यांना यश येतं ते पहावं लागेल.

COMMENTS