मुंबई – भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रात गेल्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली, तरीही इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु आमदार हाळवणकर यांना श्रेष्ठींनी शब्द दिल्याची माहिती आहे. त्याचबरोबर २१ जुलैच्या बैठकीत मुंबई अध्यक्षांचीही निवड केली जाणार आहे. या पदासाठी खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी आदींची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे २१ जुलैच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS