बीड – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. भाजपकडून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सरकारवर दबाव आणला जात असताना राठोड यांच्या समर्थनार्थ राज्यात अनेक जण पुढे येत आहेत. अशातच चक्क भाजपच्या सरपंचानं संजय राठोड यांचं समर्थन करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
पूजा चव्हाण हिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेऊन आरोप केला आहे. तसंच, सोशल मीडियावर या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपनं राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे बंजारा समाज संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा या गावच्या सरपंचानं भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सरपंच कमल नाथराव चव्हाण असं या सरपंचाचं नाव असून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तसंच, वनमंत्री संजय राठोड यांचं समर्थनही केलं आहे.
COMMENTS