नवी दिल्ली – आगामी लोकसभा मिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. देशभरातून अनेक पक्ष भाजपविरोधात एकत्रित येत आहेत. भाजपच्या विरोधात राजकीय आघाडी करण्याच्या दिशेने आता उत्तर प्रदेशमधील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्णायक घडामोडी घडू लागल्या आहेत. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येत आहेत. यासंदर्भात बसपाच्या मायावती आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यात चर्चा झाली होती. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान 2014 मधील भाजपच्या दणक्यानंतर या दोन्ही पक्षांनी आता निवडणुकीपूर्वीच सावधगिरी बाळगत आघाडीची घोषणा करण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 37 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तसेत उर्वरित सहा जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मायवती यांनी अखिलेश यादव यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. ‘ही एका नव्या आघाडीची नांदी असल्याची प्रतिक्रिया अखिलेश यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आगामी निवडणुकीत एकत्रित येण्यासाठी हालचालींना वेग आला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS