दीड वर्षांनंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

दीड वर्षांनंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली – भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण शरद पवार यांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितलं.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी दीड वर्षांपूर्वी अचानक राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा उदयनराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली नव्हती. भाजपच्यावतीने त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यानिमित्ताने उदयनराजे दररोज वेगवेगळ्या मंत्री आणि विविध पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. आज ते शरद पवार यांना भेट घेतले.

यावेळी उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती काही मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.” तसेच, आज मराठा समजातील लोकांची एवढीच अपेक्षा आहे की, “अन्य समाजातील लोकांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं. त्याचप्रमाणे कुणाचाही आरक्षणाला धक्का न लावता, आम्हाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. शरद पवार हे मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात सक्रीय आहेत व आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. त्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. अन्यथा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. या अगोदर शांततेत मोर्चे निघाले, पण जर आरक्षण मिळालं नाही तर काय होईल हे सांगता येणार नाही, त्याची कल्पना देखील करता येणार नाही.” असा इशारा देखील या वेळी उदयनराजेंनी राज्य सरकारला दिला.

COMMENTS