युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी ?

युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी ?

मुंबई – आगामी निवडणुकांसाठी भाजपनं आता सावध पवित्रा घेतला असून राज्यात युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा प्रस्ताव मान्य करुन आगामी निवडणुकीत युती करणार का याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार हे शिवसेनेची मनधरणी करण्यात कितपत यश मिळवतात याकडेही लक्ष लागलं आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. ‘केंद्रातली एनडीएची आघाडी राज्यात टिकवण्याचा आमचा प्रयत्न असून मित्र पक्षाला सोडून निवडणुका लढवण्याची आम्ही कुठलीही घोषणा केली नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच युतीसाठी चर्चेला कोण जाणार याबाबतचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत.

राज्यात आणि देशात मित्र पक्षांची भाजपवर वाढत असलेली नाराजी पाहता भाजप आता एक पाऊल मागे घेणार असल्याचं दिसत आहे. तसेच आगामी निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. मात्र, आता भाजपनं मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे युती होते की, पुन्हा शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात उभे राहतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

COMMENTS