मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील 3 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. यामध्ये भाजपच्या 2, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.आज पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काँग्रेसचे राजपती यादव, भाजपचे मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा केली. या नगरसेवकांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
दरम्यान जात पडताळणी समितीने एकूण 5 जणांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरवले होते. त्याविरोधात या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी 2 जणांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
तसेच संबंधित 3 नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारांची निवड होऊ शकते. तसे झाल्यास प्रभाग क्रमांक 28 मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 76 मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे (काँग्रेस), प्रभाग क्रमांक – 81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.
COMMENTS