बीएमसीचा ऐतिहासिक ठेवा पर्यटकांसाठी खुला

मुंबई – पर्यटकांना आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वास्तूची सफर करता येणार आहे. गॉथिक शैलीतील १५० वर्षांचा ऐतिहासिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी गेल्याच वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना महानगरपालिकेच्या वास्तुची सफर करता येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

या हेरिटेज वॉकचा पहिला मान अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला. त्यांच्या हस्ते या योजनेस सुरुवात झाली. महापालिका इमारत गॉथिक शैलीतील आहे. ही चार मजली इमारत दगडी कामातून तयार झाली आहे. ही इमारत जागतिक वारसा यादीत येते. या इमारतीच्या बाजूलाच पालिकेची सहा मजली विस्तारीत इमारत आहे. महापालिकेत पालिका आयुक्त, महापौर, चार अतिरिक्त आयुक्त, गटनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विविध खात्यांची दालने आहेत. तसेच महापालिका सभागृह हे या इमारतीचं मुख्य आकर्षण आहे. पालिका सभागृहात विविध महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांना पाहता येणार आहेत.

पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे. त्यासाठी एक गाईडही ठेवण्यात आला आहे. या गाईडच्या मदतीने पर्यटकांना या इमारतीचा इतिहास जाणून घेता येणार आहे.

COMMENTS