ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी बीएमसी ही देशातील पहिलीच महापालिका

मुंबई महापालिका मध्य वैतरणा तलावाच्या ठिकाणी १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. यामध्ये, २० मेगावॅट जल वीज निर्मिती तर ८० मेगावॅट तरंगती सौर ऊर्जा निर्मिती , अशी एकूण १०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

पेडणेकर म्हणाल्या, यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेच्या जल अभियंता खात्याच्या अभियंत्यांनी तानसा तलाव या ठिकाणी काही वर्षांपुर्वी ४९ लाख रुपये खर्चून ४० किलो वॅट एवढी जल विद्युत निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे पालिकेला तानसा परिसरातील कार्यालयीन वापरासाठी आवश्यक दरमहा २० लाख रुपयांची वीज वापरावी लागत असे मात्र आता जल विद्युत प्रकल्पामुळे ५०% वीज खर्चात बचत होत आहे.

मध्य वैतरणा जल व सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पालिकेकडून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होणार आहे. परिणामी महापालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी २४ कोटी १८ लाखांची बचत होणार आहे. मुंबई महापालिका संचालित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयात २० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा असा एकूण १०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबई महापालिका ही संकरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.

COMMENTS