मंत्रिमंडळ विस्तारात उस्मानाबादला लाल दिवा मिळणार ? संघटनेतही खांदेपालट ?

मंत्रिमंडळ विस्तारात उस्मानाबादला लाल दिवा मिळणार ? संघटनेतही खांदेपालट ?

उस्मानाबाद – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्याला लाल दिवा मिळणार असून शिवसेनेच्या गोटात उलथापालत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना उपनेते तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच जिल्ह्याअंतर्गत शिवसेनेतही फेरबदल होणार असून एका तरुण कार्यकर्त्याला जिल्हाप्रमुखपद मिळणार असून विद्यमान जिल्हाप्रमुख यांना सहसंपर्कपदी बढती मिळणार असल्याची चर्चा आहे.

प्रा. तानाजी सावंत यांना शिवजलक्रांतीने एका वेगळ्या वळणावर पोहचविले आहे. त्यानंतर त्यांना आमदार आणि शिवसेना उपनेतेपदही मिळाले. सध्या त्यांचे पक्षसंघटनेतही त्यांचे वजन वाढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे व विश्‍वासू मानले जातात. दरम्यान आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रा. सावंत यांना संधी मिळणार असून त्यांच्याकडे आरोग्य खात्याचा पदभार जाणार अशीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री परदेशातून आल्यावर लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे अशी चर्चा आहे.

पालकमंत्री बदलणार ? 

दुग्धविकास, पशुसंवसर्धन व मस्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार आहे. मात्र नव्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यांच्याकडील पालकमंत्रीपद प्रा. सावंत यांच्याकडे जावू शकते. दरम्यान पालकमंत्री बदलाने शिवसेनेला जिल्ह्यात एक नवी झळाळी मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

जिल्हाप्रमुखपद तरुणाकडे? 

जिल्हाप्रमुखपद एका तरुण कार्यकर्त्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद तालुक्यातील या कार्यकर्त्याला संधी मिळणार असल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्यात यश येईल, असा विश्‍वास सुत्रांनी व्यक्त केला आहे. आजही या कार्यकर्त्याचा उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात चांगलाच दबदबा आहे. तर शेतीसह विविध विषयांचा चौफेर अभ्यास आहे. तसेच शांत आणि संयमी असल्याने सर्व गटातटांना एकत्र घेऊन जाण्याची त्याची हातोटी पक्षसंघटनेच्या फायद्याची ठरेल, अशी चर्चा शिवसैनिकात सुरू आहे. तर विद्यमान जिल्हाप्रमुख अनिल खोचरे यांना बढती दिली जाणार असून त्यांना सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS