मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले असून दोन खात्यांचे मंत्रीही बदलण्यात आले आहेत. गिरीश बापट हे खासदार झाल्याने त्यांच्याकडील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर बापटांकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद हे आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तर जळगावचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे या विस्तारात कोणकोणत्या नवीन चेह-यांना संधी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसेच रावसाहेब दानवे खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड करायची याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
COMMENTS