नवी दिल्ली – गेली काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील संबंध विकोपाला गेले असल्याचं पहावयास मिलालं आहे. परंतु केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील तणाव संपुष्टात येत असल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असून या भेटीत केंद्र व रिझर्व्ह बँकेत ज्या मुद्द्यांवरुन वाद होता त्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यातील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. अशी माहिती आहे.
दरम्यान केंद्र व रिझर्व्ह बँकेतील संघर्षानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली आहे. या भेटीमुळे केंद्र व रिझर्व्ह बँकेतील तणाव कमी होण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून मोठा हिस्सा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असून बँकांच्या कर्ज वितरणावर आणलेले निर्बंध दूर करण्याची मागणी केंद्र सरकारनं केली होती.
त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात सरकारवर टीका केली होती. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. त्यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील संबंध दुरावत होते. परंतु उर्जित पटेल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ते सुधारत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS