नवी दिल्ली – खरीप पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतीमालाच्या भावावरुन अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी उत्पादन खर्च कोणत्या पद्धतीनं मोजला जातो यावरच या निर्णयाचा शेतक-यांना किती फायदा होतो ते अवलंबून असणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी दीडपट भावाबाबत मंत्रिमंडळ लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन शेतक-यांच्या शिष्टमंडळाला दिलं होतं.
केंद्र सरकारनं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सत्तेवर आल्यानंतर तब्बल सव्वाचार वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्च धरला जातो का यावरच या निर्णयाचं यश अपयश अवलंबून आहे. धान उत्पादकांना यामध्ये सर्वाधिक फायदा होणार आहे. त्याला खरेदीदरामध्ये तब्बल क्विंटलमागे 200 रुपयांची वाढ मिळाली आहे.
COMMENTS