नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता केंद्र सरकार आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चामध्ये लॉकडाऊन वाढवण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून त्यानंतर पाचवा टप्पा जाहीर करून लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान देशात कोरोनाचं संकट वाढतच असून देशभरात कोविड रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजारावर पोहचली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेप्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून देशाला संदेश देतात. या रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी ते लॉकडाऊन वाढवण्याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS