अडीच वर्षानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या भाषणात भुजबळ काय म्हणाले ?

अडीच वर्षानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या भाषणात भुजबळ काय म्हणाले ?

नागपूर –  पावसाळी अधिवेशनादरम्यान आज अडीच वर्षानंतर भुजबळ यांनी पहिल्यांदाच विधानसभेत आपलं भाषण केलं आहे. यादरम्यान यावेळी भुजबळ यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पहावयास मिळालं आहे. अर्थ संकल्पाच्य्या 3 टक्‍क्‍यांपर्यंत पुरवणी मागण्या मांडता येतात, परंतु या सरकारने ती मर्यादा ओलांडली असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच यापूर्वी अर्थमंत्री विरोधी पक्षात असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर पुरवणी मागण्यांवरून टीका करायचे. पण तुम्ही आता एवढ्या मोठ्याप्रमाणात पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली असल्याची टीकाही यावेळी भुजबळ यांनी विधानसभेत केली आहे.

दरम्यान मागील तीन वर्षात तुम्ही एक लाख 56 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे या सरकारने आर्थिक शिस्त बिघडण्याचे काम केले असून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे हुशार आणि ज्यांच्यावर कुणाचाही दबाव येत नाही ते असे का करतात असा सवालही यावेळी भुजबळ यांनी केला आहे. तसेच वनखात्याने 50 कोटी झाडे लावण्याची तरतुद केली असून हे काम चांगले आहे. परंतु ही 50 कोटी झाडं कुणाला तरी मोजायला सांगा. कारण तुमचा शब्द राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. झाडं न लावता तुम्हाला खोटे आकडे दिले जातील असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वन हक्क मागण्यासाठी आदिवासी शेतकरी नाशिकहून चालत आले होते. त्यांना तुम्ही आशा देऊन परत पाठवले. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. नाशिकमधली वन हक्काची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. एक महिन्यात वन हक्काची जमीन देऊ असे आश्वासन तुम्ही दिले होते. परंतु त्याबाबतही अद्याप काहीही झालं नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत वन अधिका-यांना विचारलं असता ते सांगतायत की आम्ही 50 कोटी झाडं लावतोय त्यामुळे ते काम करायला आम्हाला वेळ नाही.

दरम्यान सभागृहात भुजबळ यांनी केलेल्या या आरोपांमुळे वनमंत्री चांगलेच भडकले असल्याचं पहावायस मिळालं हे काम कुणाचे ते आधी तपासा असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अडीच वर्षानंतरच्या सभागृहातील पहिल्याच भाषणात छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS