मुख्यमंत्र्यांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, “एवढं मनावर का घेता ?”

मुख्यमंत्र्यांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, “एवढं मनावर का घेता ?”

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सगळ्या जगाला माहित आहे. मी जामिनावर आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी माझ्या भाषणाची नोंद घेतल्याबद्दल मी आभारी आहे. नकलाकाराचं एवढं मनावर का घेता? हसून सोडून द्यायला हवं होतं, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

दरम्यान विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाइल मारत फिरतात. पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला होता.

छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यावर भुजबळ यांनी अखेर प्रत्युत्तर दिलं असून नकलाकाराचं एवढं मनावर का घेता? हसून सोडून द्यायला हवं होतं, असं म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर महाआघाडीत येतील असा विश्वासही व्यक्त केला.’प्रकाश आंबेडकर हे 12 जागेवर अडून बसले आहेत. बाकी अटी शर्ती मान्य आहेत. आज उद्या चर्चा होईल. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा शेवटपर्यंतचा आमचा प्रयत्न असेल. ते महाआघाडीमध्ये सहभागी होतील’, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

 

COMMENTS