नागपूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज विधीमंडळ कामकाजादरम्यान मनुस्मृतीवरुन सरकारला चांगलेच टोले लगावले. भारतासोबत अनेक देश स्वतंत्र झाले, मात्र त्या देशात लोकशाही कायम राहिली नाही,केवळ भारतातच आतापर्यंत लोकशाही कायम राहिली, कारण बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे आम्हाला अंधाराने भरलेली मनुस्मृती नको, आम्हाला केवळ संविधान पाहिजे अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.
दरम्यान मनुस्मृतीमुळे शूद्र व महिलांना हीन वागणूक मिळाली. आज पुन्हा एकदा मनुवादी कार्यक्रम सुरू झाले आहेत, अंधश्रद्धेचं पीक पुन्हा फोफावत आहे. एक लाट आली, त्या लाटेत देश वाहून गेला, खोटी आश्वासने देण्यात आली. अत्याचार करणाऱ्यांना आमचा विरोध आहे असे कोणीच म्हणत नाही, शाळांतून पुस्तके वाटायची आहेत तर सर्व धर्माची पुस्तके वाटा कुठलाही धर्म आपसांत द्वेष करण्याचे शिक्षण देत नसल्याचं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच करणी व कथनीमध्ये फरक असून मनुवाद गाडला नाही तर स्त्रियांना, शूद्रांना पूर्वीचे दिवस येतील, विचार स्वतंत्र नष्ट होतील, शिकण्याचा, राज्य करण्याचा अधिकार कोणा एका समाजाचा नाही. त्यामुळे आम्हाला मनुस्मृती नको बाबासाहेबांनी दिलेलं संविधानच हवय असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS