नवी दिल्ली – कर्नाटकमधील जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा संविधानाला धरुन नसल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदू महासभेनं ही याचिका दाखल केली असून त्यांनी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणी वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. कालच लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं होतं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असतानाच आता हिंदू महासभेच्या याचिकेमुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान उद्या कुमारस्वामी यांच्या मंत्रीमंडळाच शपथविधी पार पडणार आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे.
COMMENTS