मुंबई – आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटीलयांनी केलं आहे. विधानसभेत अजित पवारांच्या प्रश्नावर बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी हे उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा याच अधिवेशनात मंजूर करू, त्यासाठी वेळ कमी पडला तर अधिवेशनाचा कालावधी वाढवू अशी हमी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी सरकार इतक्या संवेदनशील प्रश्नासंदर्भात जल्लोष कसा काय करू शकते असे विचारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो असून काहीही चूक करणार नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली.
तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कृती अहवाल सादर करण्यात येत असल्याचे, तसेच त्यावर साधक बाधक चर्चा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जर अधिवेशनाची वेळ कमी पडली तर ती वाढवू परंतु विधानसभेच्या याच अधिवेशनात यासंदर्भातला कायदा मंजूर करणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे हे विधेयक आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवालही राज्य सरकार सादर करत आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, न्यायालयीन लढाईत हे आरक्षण टिकविण्यासाठी स्वतंत्र कायदा करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS