मुंबई – रखडलेल्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न नेहमीच विधीमंडळ अधिवेशनात वेगवेगळ्या माध्यमातून विचारला जातो. दरवेळी यावर उत्तर देतांना सार्वजनिक बांधकममंत्री या रस्त्याच्या कामाची प्रगती सांगतांना डेडलाईनही ठासून सांगतात. तसंच या प्रकल्पावर थेट पंतप्रधान कार्यालयाचेही लक्ष असल्यानं हा प्रकल्प महत्त्वाचा झाला आहे. शुक्रवारी विधानपरिषदेत तक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमतून प्रश्न उपस्थित झाला असता रखडलेल्या कामाबाबत स्वत: मंत्र्यांनी हतबलता व्यक्त केली. महाराष्ट्रात हैराण करणारे खुप कमी प्रकल्प आहेत. त्यापैकी सर्वाधिक हैराण करणारे काम या महामार्गाचे आहे, अशी कबुली मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनील तटकरे यांनी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबातचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. या महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे दावे रखडलेले आहे. पनवेल-इंदापूर टप्प्यावरील संपादनाचा मोबदला आणि त्यापुढील जमीनीसाठी वेगळा मोबदला असल्याने अनेक दावे दाखल करण्यात आले आहे. वेळेत या दाव्यांचा निपटारा होत नसल्याचा मुद्दा तटकरे यांनी मांडला. तर इंदापूरच्या पुढे २८ जणांनी जमिनीच दिले नसल्याने यंदाच्या वर्षीही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार नसल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झारप या दुस-या टप्प्यातील काम वेगाने पुर्णत्वाकडे जात आहे. या भागातील पुल बांधणीची कामे जोरात सुरु आहेत. मात्र त्या तुलनेत पनवेल-इंदापूरचा पहिला टप्पा मात्र रखडल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मान्य केलं. या टप्प्यातील दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील. तसेच, सोमवारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
COMMENTS