उंदीर घोटाळ्याबाबत सरकारकडून तातडीनं निवेदन !

उंदीर घोटाळ्याबाबत सरकारकडून तातडीनं निवेदन !

मुंबई – मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याबाबत सरकारकडून तातडीनं निवेदन देण्यात आलं आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निवेदन दिलं आहे. इंटरनेटच्या केबल्स आणि वीजेच्या केबल्स सुरक्षित राहण्यासाठी उंदीर निर्मूलनाचे काम दिलं असून उंदीर निर्मूलनाकरता 1984 पासून हे काम सातत्याने हाती घेण्यात आलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्रालयात उंदीर निर्मूलनासाठी ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या ठेवण्यात आल्या असून ती संख्या उंदरांची नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी उंदीर मारण्याचं काम विनायक मजूर सहकारी संस्थेला देण्यात आलं होतं. तसेच समितीमार्फत हे काम दिले जाते, केवळ वर्क ऑर्डर काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच कंत्राट दिलेल्या विनायक मजूर सहकारी संस्थेच्या अस्तित्वाची माहिती घेण्याचे पत्र दिलं असल्याची माहितीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या उंदीर घोटाळ्याबाबत अखेर सरकारनं स्पष्टीकरण दिलं असून या घोटाळ्याबाबत सभागृहात जोरदार चर्चा झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. या घोटाळ्यावरुन विरोधकांनीही जोरदार टीका केली. त्यामुळे गेली तीन चार दिवसापासून मंत्रालय अगदी उंदरालय झालं असल्याचं पहावयास मिळालं होतं.

COMMENTS