पुणे – निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं राहात असतात मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला.
पुण्यातील उद्घाटन समारंभात शिवसेनेवर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले की, शिवसेनेनं निवडणुकीअगोदर १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं अश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा प्रश्न उपस्थित होतो.
पाटील म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. जनतेला दिलेल्या अश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील.
COMMENTS