नवी मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. गेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भाजपचे १२२ आमदार, अपक्षांचे समर्थन आणि इतर पक्षांमधून आलेले आमदार यांचा विचार करता आज भाजपचे संख्याबळ हे १३२ आमदारांचे आहे. त्यामुळे १३५ जागांवर समाधान मानणे भाजपसाठी अशक्य आहे. मुख्य म्हणजे याची जाणीव शिवसेनेलासुद्धा आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यंदा शक्य नसल्याचं पाटील यांनी म्हटलं होतं.
त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना टोला लगावला होता. शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाचा निर्णय हा मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा तिघे मिळून ठरवू. जागावाटपाचा अधिकार आम्हा तिघांना असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं हेतं.
त्यानंतर यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी विधानसभा निवडणूकीचा युतीचा फाॅर्म्यूला ठरला तेव्हा मी नव्हतो.
त्यामुळे युतीच्या जागा वाटपाबाबत पक्षाला जादा जागा मागणे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम आहे. ते मी करतोय. युतीमध्ये किती जागा वाटून घ्यायच्या याचा अधिकार मुख्यमंत्री, अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांनाच आहे. असं म्हणत पाटील यांनी जागावाटपावरून यूटर्न घेतला आहे.
COMMENTS