नागपूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवस्मारक बांधकाम निविदेमागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच केला होता. आता कॅगच्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होत चाललं आहे. चंद्रकांत पाटील यामध्ये दोषी आहेत, त्यांनीच हे सर्व घडवून आणलं असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअरची नोट, त्याकाळातील कॅगच्या अधिकाऱ्यांचे शेरे, यावरुन स्पष्टपणे दिसतं की ठेकेदार कंपन्यांच्या निविदा मॅनेज करण्यात आल्या. किंमत वाढवून देण्यात आली आणि इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्मारक होत असताना भाजपवाल्यांनी पैसे खाल्ले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
कॅगनेच अहवाल दिल्याने चंद्रकांत पाटील आता नाकारु शकत नाहीत. चंद्रकांत पाटील, पीडब्ल्यूडी विभाग यांनी भ्रष्टाचार केलाच आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हा विषय आम्ही विधानसभेत लावून धरणार आणि याची चौकशी करणार अलयसल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.
COMMENTS