मुंबई – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे अखेर येती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. चंद्रकात दादा पाटील यांच्यासाठी भाजपनं त्यांचा सर्वात सेफ मतदारसंघ शोधला आहे. पाटील हे पुणे शहरातील कोथरुड या भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. गेल्या निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी या मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तसंच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी होती. भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग या मतदार संघात येतो. त्यामुळे भाजपनं चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आहे.
चंद्रकांत दादा विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलट सुलट चर्चा सुरू होत्या. ते कोल्हापूर जिल्ह्याती एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मात्र पक्षाने तशी रिस्क न घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांना अत्यंत सेफ मतदारसंघातून उभं केलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चंद्रकांत दादा पाटील निवडणुकीला उभे राहिले तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातून न उभा राहता चंद्रकांत दादा हे पुण्यातील भाजपच्या सर्वात सेफ मतदारसंघातून नशीब अजमावणार असल्याचं कळतंय. चंद्रकांत दादा राजु शेट्टींना घाबरले की काय अशी चर्चा कोल्हापुरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काहीही बांधणी नसलेल्या आणि भाजपचा गड असलेल्या या जागेवरून चंद्रकांत पाटील यांना शेट्टी आव्हान देतात का ते पहावं लागेल.
चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनीही त्यांची अनेकवेळा यावरुन हेटाळणी केली होती. जे लोकांमधून निवडूण येत नाहीत त्यांच्याविषयी काय बोलायचे असं टोमणे शरद पवार यांनी पाटील यांना लगावले होते. त्यामुळेच भाजपनं त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र कोल्हापूरहून न लढता पुण्यातून लढल्यामुळे पुन्हा एकदा विरोधक त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुण्यातील कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. हेमंत रासणे, धीरज घाटे, गणेश बीडकर अशी अनेक दिग्गज या मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक होती. मात्र पक्षाने मुक्ता टिळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय. त्यांची लढत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. रविंद्र धंगेकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
COMMENTS