धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयात दोषारोप पत्र दाखल !

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयात दोषारोप पत्र दाखल !

बीड – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्यासह दोघांवर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी चाळीस लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. 420, 465, 468, 471, 419 या कलमाअन्वये मुंडे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची न्यायालयात पहिली तारीख असणार आहे.

काय आहे प्रकरण ?

धनंजय मुंडे यांनी शेतकरी मुंजा किसनराव गीते यांची तीन हेक्‍टर 12 आर जमीन पूस (ता. अंबाजोगाई) येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी घेण्यात आली होती. 50 लाखांत घेण्यात आलेल्या या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. ठरल्याप्रमाणे प्रथम एक लाख व नंतर सात लाख 81 हजार 250 रुपयांचा धनादेश देण्यात आला. नंतर मुंडे यांनी परळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा 40 लाख रुपयांचा धनादेश गीते यांना दिला. हा धनादेश न वटताच परत आला. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात आमदार मुंडेंवर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शासनातर्फे खंडपीठात देण्यात आली होती. त्यानंतर आज मुंडे यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

 

COMMENTS