नाशिक – तुरुंगातून सुटल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पाऊल ठेवलं. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी गुढ्या उभा करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी रांगोळी काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीसह नाशिकमध्ये भुजबळांची धुमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. तसेच पाथर्डी फाट्यापासून ढोल ताशाच्या गजरात भुजबळांचं स्वागत करण्यात आलं. यावरुन भुजबळ समर्थकांनी छगन भुजबळ हे नाशिकच्या राजकारणावर लवकरच पकड घेतील, असा सूचक इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान छगन भुजबळ हे नाशिकचा सहा दिवसांचा दौरा करणार आहेत.या दौ-यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर येवला या त्यांच्या मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येवल्यात एक मुक्काम टाकून शनिवारी 16 जूनला येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर दुपारी दीड वाजता शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन ते नाशिकच्या भुजबळ फार्मवर मुक्काम करणार आहेत. तसेच रविवारी 17 जून रोजी सकाळी दहा वाजता सप्तश्रृंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नाशिकला मुक्काम. त्यानंतर ते सोमवारी 18 जूनला सकाळी दहा वाजता नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवारी 19 जूनला सकाळी 11 वाजता नाशिकहून ते मुंबईला परतणार आहेत.दरम्यान छगन भुजबळ यांच्या या सहा दिवशीय दौ-यावरुन ते पुन्हा एकदा नाशिकमधील राजकारणावर लवकरच पकड घेतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS