औरंगाबाद – वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बाजूला ठेवून काही काळ का असेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँगसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आणि उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका विवाहसमारंभासाठी ते दोघं सोबत गेले. सत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता.
मुंबईहून रात्री खास विमानाने ते थेट चिकलठाणा विमातळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवारही होते. विमानातून उतरल्यावर वाहनापर्यंत जाताना दोघांनी विशिष्ट अंतर राखले. तरीही दोघे एकाच सफारी वाहनात बसले. ‘सफारी’ तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले! ज्या विमानातून आले त्याच विमानातून रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे विमान व कारमध्ये या दोघांशिवाय अन्य कुणीही नव्हते. त्यामुळे आता या दोघांमध्ये कुठली नवी युती होते आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे
COMMENTS